अमोल कोल्हेंची शिवस्वराज्य यात्रा आज पुन्हा सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या यात्रेला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरवात होत आहे. पैठण येथे अमोल कोल्हे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होणार आहेत.

राज्यातील ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाशिक जिल्हयात बागलाण येथे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पूरस्थिती पूर्वपदावर येत असल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेचे १९ ते २६ ऑगस्टपर्यंतचे वेळापत्रक जारी केले आहे. अमोल कोल्हे यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे या प्रमुख नेत्यांचा या यात्रेत सहभाग असणार आहे. मराठवाड्यासह यवतमाळ व नगरच्याही काही भागांतून ही यात्रा प्रवास करणार आहे. पैठण येथे १९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेस सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता जाहीर सभा, दुपारी २ वाजता बदनापूर येथे दुसरी सभा घेण्यात येणार आहे. या यात्रेत मराठवाड्यातील सारकणी (किनवट), अंबाजोगाई येथे सभा तर परभणी व बीड येथे अमोल कोल्हे युवकांशी संवाद साधणार आहेत .

तर दुसरीकडे राष्ट्रवादीप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने जाहीर केलेली पोलखोल यात्रा मात्र लांबणीवर गेली आहे. २० ऑगस्टपासून मोझरी येथून या यात्रेची सुरुवात होणार होती. मात्र, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत विशेष कार्यक्रम होणार आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते त्यासाठी दिल्लीत असतील. त्यामुळे यात्रा पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार २५ ऑगस्टला अमरावती येथून या यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात येईल.

Leave a Comment