शिवडी-वरळी उन्नत रस्त्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात आता एक मोठा टप्पा पार पडताना दिसतो आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने प्रभादेवी परिसरातील हाजी नूरानी चाळ आणि लक्ष्मी निवास येथील ९३ प्रकल्पबाधितांना त्यांच्या घरांच्या बदल्यात आकर्षक आर्थिक मोबदल्याचा पर्याय दिला आहे. आणि तोही थेट ३० लाखांपासून ते तब्बल १ कोटी १० लाखांपर्यंत.
घर की रोख? प्रकल्पबाधितांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
याआधी प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन म्हणजे नवीन घर हा एकमेव पर्याय होता. मात्र, या नव्या धोरणामुळे MMRDA ने एक मोठा पायंडा पाडला आहे. आता रहिवाशांना घराऐवजी रोख स्वरूपात मोबदला घेण्याची मुभा देण्यात आली असून, यामुळे उन्नत रस्त्याच्या कामास गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.
भूसंपादन प्रक्रिया अखेर मार्गी?
अटल सेतूकडे वेगाने आणि सुलभपणे पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या कामात भूसंपादन आणि पुनर्वसन हे मोठे अडथळे ठरत होते. प्रभादेवी परिसरातील अनेक जुन्या इमारती बाधित होत असताना रहिवाशांचे पुनर्वसन लांबणीवर जात होते. याची गंभीर दखल घेत MMRDA ने आपली धोरणे बदलली आणि आर्थिक मोबदल्याचा पर्याय समोर ठेवला.
९ एप्रिल रोजी झालेल्या MMRDA च्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांशी सविस्तर चर्चा झाली. अपार जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घराच्या क्षेत्रानुसार भरघोस मोबदला दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
पुढचा टप्पा काय?
आता या प्रकल्पबाधितांनी घराचा पर्याय स्वीकारायचा की आर्थिक मोबदल्याचा – यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे. त्यांचा निर्णय हा फक्त त्यांच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण प्रकल्पाच्या गतीसाठी निर्णायक ठरणार आहे.




