कार खरेदी करणाऱ्यांना धक्का ! आता गाड्या महागणार, यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जागतिक वाहन उद्योगाला धातूच्या वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे वाहनांच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कार निर्माते संकटाचा सामना करत आहेत. युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे कारमध्ये वापरल्या जाणार्‍या धातूंच्या किमती वाढत आहेत.

कार बनवण्यामध्ये एल्युमिनियमपासून ते कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये पॅलेडियम आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये निकेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पॅलेडियम हा सर्वात महाग धातू आहे आणि रशिया पॅलेडियमचा सर्वात मोठा उत्पादक आहे.

धातूच्या किमती वाढण्याबरोबरच पुरवठा साखळीतील व्यत्ययाचाही वाहन उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. युक्रेन संकटाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतीही वाढत आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. याव्यतिरिक्त, युक्रेन संकटामुळे सेमिकंडक्टर चिपची कमतरता होऊ शकते.

युक्रेन हा निऑनचा प्रमुख उत्पादक आहे, ज्याचा वापर मायक्रोचिप तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निऑन उत्पादन आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

स्टेलांटिसचे सीईओ कार्लोस टावरेस म्हणाले की,”सध्याच्या परिस्थितीत कच्चा माल आणि ऊर्जेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन उद्योगाच्या व्यवसायावर अधिक ताण येईल. याचा दबाव ग्राहकांवर पडेल, म्हणजे त्यांना जास्त किमतीत वाहने घ्यावी लागतील, अशी अपेक्षा आहे.”

सोमवारी एल्युमिनिअम आणि पॅलेडियमने विक्रमी उच्चांक गाठला. निकेल, ज्याचा वापर ऑटोमेकर्ससाठी स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी केला जातो, मंगळवारी पहिल्यांदाच प्रति टन $100,000 चा टप्पा पार केला. कोविड-19 महामारी आणि संबंधित व्यत्ययांमुळे जागतिक वाहन उद्योग दबावाखाली आला आहे. युक्रेन संकट अशा वेळी सुरू झाले जेव्हा वाहन उद्योग कोविड संकटातून सावरत होता.

Leave a Comment