सर्वसामान्यांना धक्का ! एसी आणि फ्रिज महागले, वॉशिंग मशिनच्या किंमतीही 10 टक्क्यांनी वाढणार

नवी दिल्ली । आगामी नवीन वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. या वर्षी ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी (FMCG कंपन्या) एअर कंडिशनर्स ( AC )आणि रेफ्रिजरेटर्सच्या ( Refrigerator) किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे या किमती वाढवण्यात आल्या असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले आहे

तसेच या महिन्यानंतर किंवा मार्च 2022 पर्यंत वॉशिंग मशीनही 5-10 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. पॅनासोनिक, एलजी आणि हायरसह अनेक कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत. सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेस या तिमाहीच्या अखेरीस किमती वाढवू शकतात.

भाव का वाढत आहेत?

हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणाले, “कमोडिटीच्या वाढणाऱ्या किंमती तसेच कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन आम्ही रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन आणि एसी श्रेणींमध्ये आमच्या उत्पादनांच्या किमती 3-5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.पॅनासोनिक इंडियाचे विभागीय संचालक (ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स) फुमियासू फुजीमोरी म्हणाले की, कमोडिटीच्या किमती आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे एसीच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते.

कच्च्या मालाच्या किमतीची चिंता

दक्षिण कोरियातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने घरगुती वस्तूंच्या श्रेणीच्या किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष (गृह उपकरणे आणि एसी व्यवसाय) दीपक बन्सल म्हणाले, “आम्ही नाविन्यपूर्ण उपायांद्वारे स्वतःच्या खर्चाची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आता व्यवसाय टिकून राहण्यासाठी दर वाढवणे गरजेचे आहे.”

आता वाढ रोखणे अवघड झाले आहे

जॉन्सनचे नियंत्रण असलेल्या हिताची एअर कंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरमीत सिंग म्हणाले की,”आता किमतीतील वाढ टाळता येणार नाही. कच्चा माल, कर आणि वाहतूक यासह उत्पादन खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत, ब्रँड एप्रिलपर्यंत किंमती 10 टक्क्यांनी वाढवेल. टप्प्याटप्प्याने एप्रिलपर्यंत किमान 8 ते 10 टक्के दरात वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.