औरंगाबाद | मुंबई पोलीस दलात सहायक निरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. या गुन्ह्यात औरंगाबादेतून तरुणाला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी मंगळवारी एमआयडीसी सिडको भागात ही कारवाई केली. या आरोपीसह अन्य दोघांनी मोबाईल मधील चित्रीकरण दाखवून पीडितेला ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे.
संदीप भारत ठाकूर (38, रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवासापूर्वी त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे त्याचे लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तसेच, पीडितेनेही पतिसोबत फारकत घेतली आहे. तिनेही संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे. त्याद्वारे महिलेची संदिपसोबत ओळख झाली. संदिपने स्वतःला बँकेत कामाला असल्याचे सांगून ओळख वाढवली. मोबाईल क्रमकांची देवाणघेवाण झाल्यानंतर मैत्री वाढली.
संदीप व पीडित महिला एकमेकांना मुंबईमध्ये भेटले. त्यावेळी संदीपने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका ठिकाणी अत्याचार केला. त्यानंतर संदीपची पत्नी पुन्हा त्याच्यासोबत राहण्यास परतली. त्यामुळे दोंघातील संबंध संपले. पीडितेचा विवाह जमल्याचे समजल्यानंतर संदीपने ब्लॅकमेलिंग सुरु केले.
लग्न मोडले : सदर महिला अधिकाऱ्यांचे नौदलातील एका जवानसोबत लग्न ठरले. ही बाब संदिपला कळताच त्याने विवाह मोडण्यासाठी नौदलातील जवानाला पीडितेवर केलेल्या अत्याचाराचे मोबाईलमधील चित्रीकरण पाठवले. त्यामुळे पीडितेने 12 जून रोजी पवई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांचे एक पथक मंगळवारी पहाटे शहरात दाखल झाले. त्यांनी सापळा रचून मुख्य आरोपी संदिपला अटक केली.