धक्कादायक! संचारबंदी असतानाही पुण्यात अकरावीची परीक्षा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊनच संचारबंदी जाहीर करण्यापूर्वीच शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सामुदायिक संसर्ग आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात होता. त्यामुळे काही परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या तर राज्यातील परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. म्हणूनच संचारबंदीचे नियम शिथिल केले असूनही शाळा महाविद्यालयांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही असे असतानाही पुण्यातील तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये परीक्षा घेतली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

वडगाव मावळचे तहसीलदार यांनी याठिकाणी छापा टाकून ही घटना उघडकीस आणली आहे. छापा टाकला त्यावेळेस येथे अकरावी वाणिज्य विभागाच्या परीक्षा सुरु होत्या. या कृत्यामुळे या महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरावी वाणिज्य विभागात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा होती. तळेगाव पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी ही माहिती  दिली. तसेच ३३ विद्यार्थ्यांना व्हाट्सअप वर मेसेज टाकून बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील २७ विद्यार्थी परीक्षेस हजर होते.

काल एक पेपर झाला होता. त्यानंतर पुन्हा पेपर होण्याची माहिती मिळाल्यावर हा सापळा रचण्यात आला होता. राज्यातील वातावरण इतके गंभीर झाले असताना या अशा प्रकारचे कृत्य हे धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेस येण्यास भाग पाडणे चुकीचे असल्याचेही बोलले जात आहे. सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत तरीही या परीक्षा घेतल्याने संचारबंदीचे उल्लंघन ही करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांपैकी एकाला जरी कोरोनाची लागण झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. एकप्रकारे अशा विद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment