धक्कादायक! मुलगी झाल्याचे समजून जन्मदात्या आईने अवघ्या चार तासांचा मुलगा फेकला झुडुपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक झुडुपात फेकले. मात्र, हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ‘ते’ आमचेच असल्याचा दावा या दाम्पत्याने केला. ही घटना वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात घडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी.एन.ए चाचणीसाठी पाठविले आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसांत दाम्पत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील टुनकी शिवारातील गट क्रमांक ११० मध्ये बुधवारी सकाळीच अवघ्या चार तासांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. यासंबंधी पोलीस पाटील रावण निकम यांनी सदरील घटनेची माहिती शिऊर पोलिसांत कळवली. त्यांनी त्या अर्भकाला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तातडीने पाठवले. मात्र, पुरुष जातीचे अर्भक सापडले, अशी चर्चा गावात होताच, गावातील सुनीता अशोक साळुके व अशोक चंद्रभान साळंके यांनी दावा करीत आम्हीच हे अर्भक फेकले असल्याची कबुली पोलिसांना दिली.

सुनीता सालुंके यांना अगोदरच पाच मुली होत्या. सहावीसुद्धा मुलगीच झाली, असा संशय आल्याने त्यांनी स्वत: बुधवारी पहाटे अवघ्या काही तासांचे अर्भक परिसरातील शेतात फेकले होते. सकाळी गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली. ही चर्चा साळुके कुटुंबियांपर्यंत पोहोचताच त्यांनी अर्भकाकडे धाव घेत, ते आमचेच असल्याचे पोलिसांना सांगितले.

आम्हीच हे अर्भक फेकले असल्याचे साळुके कुटुंबियांनी मान्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उलगडा व्हावा, तसेच सापडलेले अर्भक खरंच साळुके कुटुंबियाचेच आहे का याचा शोध घेण्यासाठी त्यांना औरंगाबादला डी.एन.ए. चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती साह्ययक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment