Wednesday, June 7, 2023

धक्कादायक !!! पोलीस हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सदरचा प्रकार हा पहाटे पाऊने तीन वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस लाईन मध्ये घडला. रामचंद्र कृष्णा बिरणगे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक तणावातून बिरणगे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, या घटनेची संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा पोलिस दलात ते कार्यरत होते. चार दिवसापूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी आरती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत त्यांनी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती.

त्यानुसार सुजाता हेगडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर बिरणगे हे कौटुंबिक तणावात होते. पहाटे पाऊने तीन वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण झोपले असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.