औरंगाबाद । पोलीस स्थानकात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तरूणालाच पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. एक तरूणाने आपण डोकं फुटलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेला असताना पोलीस कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी पीडित सुनील मगर डोके फुटलेल्या अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तक्रार दाखल करण्याऐवजी पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनीच त्याला बेदम मारहाण केल्याचे सुनील मगर या तरूणाने सांगितले आहे. जखमी तरुण सुनील मगर आणि सोनू घुरी या दोघांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता, हा वाद मारामारीपर्यंत गेला. त्यात सुनील मगरचे डोके फुटले. त्यानंतर सुनील तक्रार नोंदवण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी सुनीलचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला.
मारहाण करणारा सोनू घुरी आणि पोलीस कर्मचारी दीपक जाधव यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप सुनील मगर याने केला आहे. त्यातूनच आपल्याला मारहाण केल्याचे पीडित तरुणाने सांगितले आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबालाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पोलीस कर्मचारी दीपक जाधव यांनी सुनीलला केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group