जालना – कुठलीही आई हि आपल्या मुलांचे पालनपोषण संगोपन करते परंतु जालना जिह्यात एका आईने आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उघड झाली. पोलिसांना रात्री घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह हस्तगत केला आहे. या घटनेमुळे जालना जिह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे (वय २२) ही विवाहित महिला तिच्या जावाला उपचारासाठी अंबड येथे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यास गेली होती. या महिलेसोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य देखील होता. जावाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने शीतल उघडे ही रूग्णालयाच्या बाहेर पडली. परंतु, सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचे निमित्त करून या मुलाला तिथे एक व्यक्तीच्या हवाली केले. मात्र, थोड्याच वेळात ती तो व्यक्ती मुलासह गायब झाले. त्यानंतर शीतल उघडे हिने मुलगा हरवल्याची अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. तसेच त्या व्यक्तीने दिलेला मोबाईल नंबर पोलिसांना दिला. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा तपास कामाला लागली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्या शीतल उघडे हिने ज्या व्यक्तीकडे मुलाला थांबले होते, तो त्या महिलेला प्रियकर असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी शीतल उघडे हिने दिलेल्या मोबाईल नंबरवरून प्रियकर नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशी दरम्यान प्रेमामध्ये आडकाठी ठरत असल्याने पोटच्या मुलाचा खून केल्याची पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता.१५) रात्री आदित्य उघडेचा मृतदेह घनसांवगी रस्त्यावरील एका नाल्याच्या जवळून हस्तगत केला असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. प्रियकर नवनाथ जगधने, त्याचा मित्र गणेश रोकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून शीतल उघडे या महिलेला पोलिस आज अटक करण्याची शक्यता आहे.