Wednesday, February 8, 2023

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड

- Advertisement -

सांगली | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन लागणार असल्याने मंगळवारी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनावश्यक गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती.

सांगली शहरात किराणामाल, भाजीपाला, चिकन, मटण, अंडी यासह बेकरी पदार्थ, फळे आदींच्या खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. यामुळे सांगली शहरातील दत्त मारुती रोड, मेन रोड, बालाजी चौक, गणपती पेठ, रिसाला रोड या प्रमुख ठिकाणी सकाळी अकरापर्यंत लोकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरातील जवळजवळ सर्व प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

- Advertisement -

बुधवारपासून मनपा क्षेत्रांमध्ये जनता कर्फ्यू सुरू होत असून आठवडाभर हे निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळी सारखी गर्दी दिसत होती. लोकांनी तसेच व्यापारी वर्गानेही कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन केल्याचे दिसून आले. यावेळी बाजारपेठेत प्रशासकीय यंत्रणाही तोकडी पडल्याचे दिसून आले.