Wednesday, February 1, 2023

कष्टकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ‘श्रमशक्ती’ परिवाराचा पुढाकार

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी | कोरोना संकटाच्या काळात मदतीचे अनेक हात लोकांमधूनच वर येताना दिसत आहेत. इचलकरंजीमधील श्रमशक्ती परिवार हा त्यातीलच एक मजबूत आधार. श्रमशक्ती परिवार गेली अनेक वर्षे श्रमिक, कष्टकरी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी झटत आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्रमिक, कष्टकरी लोकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. तसेच त्यांचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. या सगळ्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी श्रमशक्ती परिवार आपल्या सभासदांना वीस हजार रुपये पासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज स्वरूपी रक्कम विना तारण वाटप करत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही सभासदाला संस्थेपर्यंत येण्याची गरज नाही. व्हिडीओ कॉलिंगद्वारे कर्जाची आणि संस्थेच्या विमा योजनांची माहिती सभासदांना दिली जात असून ऑनलाईन पद्धतीनेच त्यांना कर्जाचे वाटप केलं जात आहे. गेल्या आठ दिवसात सभासदांना 2500000/- (पंचवीस लाख रुपये) इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात आली आहे.

श्रमशक्ती परिवार

येत्या काळात सभासदांना लघुउद्योग उभे करण्यासाठी लागणारा अर्थपुरवठा करण्याचा मानसदेखील श्रमशक्तीचे चेअरमन कॉ. आप्पा पाटील यांनी बोलून दाखवला. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस व ग्रामपंचायत कामगार जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुध्द लढत आहेत त्यांनासुद्धा गरजेप्रमाणे कर्ज रकमेचे वाटप ऑनलाइन पध्दतीने सुरू करण्यात आलं आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य कष्टकरी श्रमिकांना संकटकाळात हातभार लावण्याचे काम श्रमशक्ती परिवार करत आहे. याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन श्रमशक्तिचे चेअरमन कॉम्रेड आप्पा पाटील व कार्यकारी संचालिका कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केले आहे.