दौलतनगर येथे श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणात भव्य दिंडी व रिंगण सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री. ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

दौलतनगर (ता. पाटण) येथे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे 13 वर्ष होते. या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले होते. या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई, युवा नेते यशराज देसाई, ईश्वरी देसाई, चि. जयराज देसाई, चि. आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. तर ह.भ.प. जयवंतराव शेलार, ह.भ.प.अनिल पाटील (पापर्डेकर), ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे, ह.भ.प. दगडू माळी, नाना देसाई (पापर्डेकर),अमित लोहार, सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.

दोन वर्षानंतरचा रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते. या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दरम्यान गत दोन वर्षामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे हा रिंगण सोहळा मोठया प्रमाणांत साजरा करण्यात आला नव्हता. परंतु यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत केले अभिवादन.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री यांचा शनिवार दि. 23 रोजी  पुण्यतिथी सोहळा पार पडला.या पुण्यतिथी सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार आज पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळा व  स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेब यांचे 39 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.