श्रीकांत शिंदेंची मंत्रीपदी नियुक्ती करावी; शिवसेनेच्या सर्व खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत NDA ला बहुमत मेल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी केंद्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये नेमके कोणाकोणाला स्थान देण्यात येईल, याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमध्येच शिवसेनेच्या बाजूने श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व खासदारांनी केली आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या NDA तील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असावे, अशी चर्चा सुरू आहेत. यात मंत्रीपद कोणाच्या वाट्याला येईल याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही. दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदेंची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एका तरूण खासदाराला मंत्रीपद देण्यात यावे, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत आग्रह केला.

दरम्यान, एनडीए सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून कोणताही वाद नको म्हणून एका तरुण खासदारालाच मंत्रीपद देण्यात यावे अशी भूमिका सर्व खासदारांनी घेतली आहे. आताच्या घडीला शिंदे गटात प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, रविंद्र वायकर हे सर्व वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे आता मंत्रीपद नेमके कोणाच्या वाट्याला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.