श्रीनिवास पाटीलांनी घेतली नितिन गडकरींची भेट; कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल लवकरच होणार?

कराड | पुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. दिल्ली येथे खा. श्रीनिवास पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध प्रश्ना संदर्भात लक्ष वेधले.

पुणे ते शेंद्रे या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे. हे निदर्शनास आणून देत खा.पाटील यांनी त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी ना. गडकरी यांचेकडे केली. तसेच शेंद्रे ते कागल या भागातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहा पदरीकरणाचे‌ काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. याशिवाय कराड येथे कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पूल असल्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्या अपघातामध्ये अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. असे अपघात टाळण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी महत्वाची मागणी देखील खा. पाटील यांनी त्यांच्याकडे यावेळी केली.

त्यावर ना.नितिन गडकरी यांनी पुणे ते शेंद्रे या रस्त्याची गुणवत्ता वाढवविणार असल्याचे व शेंद्रे ते कागल या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर नाका, कराड येथे लवकरच उड्डाणपूलाचे काम सुरू होणार असून त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना केल्या असल्याचे आश्वासन त्यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना यावेळी दिले.

You might also like