परभणी जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट गर्दीसह उत्साहात शिवजयंती साजरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असणारे छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती पुतळे, प्रतिमा यांना आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविण्यात आले होते. बुधवारी सकाळपासुन याठिकाणी पांढरेशुभ्र वस्त्र ,भगवे फेटे घालत पुरुष तर महिला वर्गाने पारंपारिक साड्या परिधान करत, व भगवे फेटे घालून हत्ती, घोडे, उंट , रथ यांचा समावेश करत भव्य मिरवणुका काढल्या होत्या. यावेळी सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले. यावेळी ठिकठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने आयोजीत करण्यात आली होती. प्रमुख रस्त्यांवर भगव्या पताका, ध्वज, फेटे यांनी वातावरण भगवेमय झाले होते.

परभणी शहरातून भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली , या साठी मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने नियोजन करणयात आले होते . शहरातील शनिवार बाजार येथून संध्याकाळी ६ वाजता या मिरवणुकीला सुरवात झाली. यामध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येनेे सहभाग घेतला होता . या मिरवणुकीत हत्ती , घोडे , उंट आणि रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे रूप घेतलेल्या कलाकारांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले . या मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता . याशिवाय सहकार्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्यने होते. जिंतूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंती निमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ३९०महिलांची मशाल फेरी काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

या मशाल फेरी ची शहरातील सिद्धेश्वर मंदिरातून सुरुवात होत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विसर्जित करण्यात आली. या अभिवादन सोहळ्यास महिलांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवव्याख्याते अविनाश धायगुडे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव गिराम, माधवराव जोगदंड, अनिल नखाते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातही उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन-कीर्तनाचे कार्यक्रम तर महिला वर्गांनी शोभायात्रेमध्ये सहभागी होत पारंपारिक फुगडी खेळण्याचा आनंद घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. सोनपेठ येथे जय भवानी शिवजन्मोत्सव महीला समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा पाळणा म्हणत ,पान साखर वाटप करुन हा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात केला . या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती. याशिवाय मानवतमध्ये उंट, घोडे यांचा समावेश असणारा जीवंत देखाव्यासह, वारकरी संप्रदायातील टाळ मृदगासह वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली होती. सेलू, पालम, गंगाखेड, पूर्णा तालूक्यातही शिवप्रेमींनी अभूतपूर्व उत्साहमध्ये शिवजयंती साजरी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment