विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयांमध्ये आता समान अभ्यासक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये आता समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात असा निर्णय काल झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, परीक्षा विभागाचे बजेट आदी प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, व परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांच्यासह अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. प्रारंभी 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी आणि 5 जुलै 2019 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांत मान्य करण्यात आला. मार्च-एप्रिल 2021 आणि जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे जाहीर करण्यात आलेल्या निकालाबाबत चर्चाही करण्यात आली. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 च्या परीक्षा आयोजनाबाबतचे धोरण ठरविण्याबाबत प्रस्तावांवर चर्चा झाली. तसेच आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षासाठी परीक्षा व मूल्यमापन विभागाचे बजेटवर चर्चा करून मान्यता देण्यात आली. विद्यापीठातील विविध विभागांनी संलग्नित महाविद्यालयांमध्ये समान अभ्यासक्रम आणि परीक्षा असाव्यात अशी चर्चा करण्यात आली.

विद्यापीठाने यापूर्वी अकॅडमी कॅलेंडर जाहीर केले होते. त्यानुसार 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत होती. परंतु अनेक कारणांमुळे प्रवेश कालावधी वाढवण्यात आला होता. परिणामी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. याचा परिणाम परीक्षेवर झाला आहे. पुढील नियोजन अजून बिघडू नये यासाठी प्रथम सत्र परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाने तयार केले आहे. यानुसार 8 फेब्रुवारी 2022 पासून या परीक्षा घेण्यावर एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment