पुणे प्रतिनिधी | आपल्या दिमाखदार अभिनयाने मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटक्षेत्र गाजवणाऱ्या श्रीराम लागू यांचं आज (मंगळवारी) रात्री पावणेदहाच्या सुमारास दुःखद निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांना शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं. असं असतानाही प्रचंड इच्छाशक्ती बाळगत त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील आपला सहभाग शेवटपर्यंत नोंदवला होता.
काशीनाथ घाणेकर यांच्यानंतर मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार म्हणून श्रीराम लागू ओळखले जायचे. त्यांनी सिंहासन, सामना, पिंजरा अशा मराठीतल्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. याशिवाय नटसम्राट, मैत्र, सूर्य पाहिलेला माणूस या नाटकांतील त्यांच्या भूमिकाही चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत.
बाबा आढाव, डॉ नरेंद्र दाभोलकर, निळू फुले यांच्यासमवेत सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी बरंच काम केलं होतं. लग्नाची बेडी हे नाटक या सामाजिक उपक्रमाचं उत्तम उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे. लमाण हे त्यांचं आत्मचरित्रही मराठी साहित्यविश्वात प्रेरणादायी म्हणून गणलं जातं. भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला कलावंत म्हणून श्रीराम लागू कायम लोकांच्या स्मरणात राहतील.