Monday, January 30, 2023

सुजितसिंह ठाकूर यांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला?

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यात भाजपला विरोधी पक्षात बसावे लागल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. परंतु विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता पदावरून बराच काळ रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाले आणि अखेर सोमवारी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. परंतु त्यामुळे भाजपने निष्ठवंतांना डावलले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगात आहे.  
मराठवाड्यातील नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत होते. परंतु एका रात्रीत ठाकूर यांच्या ऐवजी दरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. 
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले ठाकूर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे विश्वासू म्हणून पुढे आले होते. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे बोलले जात होते.  परंतु भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हि संधी हुकली असल्याची चर्चा आता सुरु आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्यासह खडसेंनी भाजप नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. याच मेळाव्याला सुजितसिंह ठाकूर यांनीही उपस्थिती लावली होती. हीच उपस्थिती भाजपला खटकली असल्याने त्यांची संधी हुकली असल्याचे बोलले जात आहे.