मनमाड : हॅलो महाराष्ट्र – मनमाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे मनमाड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
संदीप गोंगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर शोभा गारुडकर असे आरोपी बहिणीचे नाव आहे. मनमाड शहरातील विवेकानंद नगर क्र.2 या भागात दुपारी ही घटना घडली. हि हत्या केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर स्वतः पोलीस स्थानक हजर झाली आणि मी माझ्या भावाचा खून केल्याची तिने पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आपली आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती.
मृत संदीप गोंगे हा तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. ती माहेरी आल्यानंतर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करायचा तसेच मारहाणसुद्धा करायचा. कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असतांना देखील संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता. घटनेच्या दिवशीसुद्धा संदीपने जेवण करत असताना बहीण शोभाला शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर शोभाने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राग आणि संतापाच्या भरात आपल्याकडून मोठी चूक झाल्याची जाणीव होताच शोभाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपण आपल्या भावाची हत्या केली असल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, उपनिरीक्षक पी.डी. सरोवर यांनी घटनास्थळी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शोभा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.