कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
श्रीराम देवस्थान ट्रस्ट मार्फत भरविण्यात येणारी सीतामाई यात्रा उद्या (दि. 15 जानेवारी) भरत आहे. शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडावी, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले. चाफळ (ता. पाटण) येथे उद्या भरणाऱ्या सीतामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार रमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, विश्वस्त अनिल साळुंखे, सरपंच आशिष पवार, बा. मा. सुतार तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार रमेश पाटील म्हणाले, करोना संक्रमणानंतर दोन वर्षांनी ही यात्रा भरत आहे. पर्यटन स्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ येथील सीतामाई यात्रेला तीन दशकांची परंपरा आहे. प्रतिवर्षी यात्रेसाठी वाढत चाललेली महिलांची संख्या विचारात घेऊन श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी बॅरिकेट, पिण्याच्या पाण्याची सोय व गाड्यांची पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी ववसा पूजन सभागृह व बकुळीची झाडे परिसरात करण्यात आली आहे.
महिलांच्या रांगांचे नियोजन करण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे 100 आरएसपीचे पथक कार्यरत राहणार आहे. चाफळला ये-जा करण्यासाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी यादिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन भोसुरे व शहनवाज आतार यांनी दिली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविक महिलांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्टॉलची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच आशिष पवार व ग्रामसेवक राजेंद्र चोरगे यांनी सांगितले. प्रास्ताविक विश्वस्त एल. एस. बाबर यांनी केले. आभार व्यवस्थापक धनंजय सुतार यांनी मानले.