हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणेची लक्क्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे? याबाबत रिऍलिटी चेक केला. यावेळी या ठिकाणी सध्या तरी रुग्णांना योग्य प्रकारे सेवा दिली जात असून औषधांचा देखील पुरेसा साठा असल्याचे दिसून आले.
कराड तालुक्यासह पाटण तसेच आसपासच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य रुग्ण कराड येथील वेणूताई चव्हान उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. काहीवेळा रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत नसल्याच्या घटना देखील येथील रुग्णालयात घडल्या आहेत. सध्या येथील रुग्णालयाचे डागडुजीचे काम केले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीत रुग्णाच्या उपचाराकडे डॉक्टरांकडून व येथील आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष न होण्याची काळजी देखील घेतली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=kwTGx_ZEapw
वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा : दिलीप खोचरे
कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात ‘हॅलो महाराष्ट्र’ ने रिॲलिटी चेक केली असता या ठिकाणी कराड तालुक्यातील बाबरमाची गावातील दिलीप खोचरे हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आले होते. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून केल्या जात असलेल्या उपचाराबाबत माहिती दिली. या ठिकाणी रुग्णांच्या बाबतीत डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांकडून चांगली सेवा दिली जात असल्याचे त्यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
नांदेडच्या घटनेनंतर प्रशासनाकडून व्हिडिओ कॉन्फरन्सरूममध्ये आढावा
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला. या यानंतर आरोग्य विभागाकडून काल सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.
बालकांची व रुग्णांची योग्य काळजी घेतली जाते : बालरोगतज्ञ डॉ. अनिल लाहोटी
कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण खासकरून बालकांच्या उपचाराची काळजी घेतली जाते. या ठिकाणी सर्व शासकीय योजना देखील आहेत. शिवाय उपलब्ध करून दिलेल्या औषध देखील रुग्णांना दिली जात असल्याचे कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. अनिल लाहोटी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.