टीम हॅलो महाराष्ट्र । स्मार्टफोन युझर्सना नेहमी येणारी अडचण म्हणजे बॅटरी बॅकअप. हे युझर्स कुठंही गेले तर आधी चार्जिंगसाठी सॉकेट शोधातात नाहीतर भल्या मोठ्या वजनाची पावरबँक घेऊन हातात फिरताना दिसतात. तर काहींच्या बॅटरी चार्च करणं स्वभावात नसतं. मात्र, अशा मंडळींना दिलासा देणारा एक नवा शोध लागला आहे.
स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संदर्भात संशोधकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्याच्या आधारे बॅटरी सलग पाच दिवस संपणार नाही. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रिक कारही पुन्हा चार्ज न करता एक हजार किमीपेक्षा जास्त चालवली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी हा प्रयोग केला. संशोधकांच्या टीमने सल्फर कॅथोड्सच्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करुन यशस्वीपणे सध्याची बॅटरीतील कॉम्बिनेशनच्या जागी वापरुन पाहिलं. या कॉम्बिनेशनच्या मदतीने कोणत्याही अडथळ्याविना बॅटरीची क्षमता प्रचंड वाढली असल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं.
‘यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक भागीदारांकडून २.५ मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला. या बॅटरीचा वापर यावर्षी इलेक्ट्रिक कार आणि ग्रिड्समध्ये केला जाणार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियातील इलेक्ट्रिक कार मार्केटलाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल’, अशी माहिती संशोधकांच्या टीममधील सदस्य मॅनक मजुमदार यांनी दिली.
नवीन बॅटरी पर्याय येत्या दोन ते चार वर्षात वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महदोख्त शाईबनी यांनी व्यक्त केला. दरम्यान, संशोधकांनी सध्या निर्मिती पेटंटसाठी अर्ज दिला आहे. जागतिक बाजारात लिथियम-आयन बॅटरीसाठी पर्याय शोधला जात असतानाच हा नवा पर्याय समोर आला आहे.