धूमस्टाईल चोरी : महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी केली लंपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन धूमस्टाईल चोरट्यांनी लंपास केली. सैदापूर-विद्यानगर येथील डी. पी. रोडवर गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत सोनाली कृष्णत चव्हाण (रा. विद्यानगर) या युवतीने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणारी सोनाली चव्हाण ही युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. गुरूवारी दुपारी ती काही कामानिमित्त घराबाहेर आली होती. डी. पी. रोडवरून ती चालत निघाली असताना पाठीमागून दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी सोनालीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची चैन हिसकावून पोबारा केला.

सोनालीने घरी गेल्यानंतर याबाबतची माहिती कुटूंबियांना दिली. शुक्रवारी दुपारी याबाबत कराड शहर पोलिसात फिर्याद देण्यात आल्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे तपास करीत आहेत.