हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बार्बाडोस येथे रात्री ८ वाजता फायनल मॅच सुरु होईल. आत्तापर्यंत अनेकदा भारताला वर्ल्डकपने चकवा दिला आहे. मागच्या वर्षी २०२३ मध्येही ५० ओव्हरच्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता तरी वर्ल्डकपचा दुष्काळ संपवावा आणि कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप ट्रॉफी उचलावी अशी इच्छा प्रत्येक भारतीयांची असेल. याच दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. ७ महिन्यांत रोहितच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस समुद्रात उडी घेईल असं गांगुली गमतीने म्हणाला.
सौरव गांगुली शुक्रवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ‘विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला येथे 8-9 सामने जिंकावे लागतील. विश्वचषक जिंकल्याने अधिक सन्मान मिळतो. मला वाटत नाही की रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली 6-7 महिन्यांत दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम पराभवाचा सामना करू शकेल. सात महिन्यांत त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस महासागरात उडी घेईल, असं सौरव गांगुली गंमतीत म्हणाला. रोहितने आत्तापर्यंत पुढे येऊन संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केलं आहे. त्याने फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे, फायनल मध्येही त्याचा हा फॉर्म कायम राहील असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला.
यावेळी गांगुलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत सुद्धा भाष्य केलं. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी संधी आहे. ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी हा मोठा क्षण आहे. असं गांगुली म्हणाला. विचार करा कि, एक असा संघ जो 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत आणि विश्वचषक फायनल खेळण्यासाठी त्याला 32 वर्षे लागली, त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे असं सौरव गांगुली म्हणाला.