भाजप आमदारांच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर ; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती

सातपुतेंच्या विवाह सोहळ्याला पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. या नेतेमंडळींसह लग्नाला हजर असलेल्या इतरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील दिसत नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो उपस्थितांनी शेअर केले. यावेळी राम सातपुतेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र अनेकांनी लग्नातील गर्दी पाहून नाराजीही व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. नेते मंडळी नियम सर्रास धाब्यावर बसवतात. मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीत आहेत का, असा सवालदेखील या सोहळ्यानंतर विचारला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment