हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा नवरात्र उत्सव (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे. या 9 दिवसाच्या काळात माता दुर्गेची पुजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालायासमोरील माती वापरली जाते. जोपर्यंत वेश्यालयाची माती या मूर्तीत मिसळली जात नाही तोपर्यंत दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यात येत नाही. पश्चिम बंगाल भागात दुर्गा देवीची मूर्ती अशाच प्रकारेच बनवली जाते. यामागे अनेक पौराणिक कथा आणि काही कारणे देखील आहेत.
नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यांच्या अंगणातील मातीचा वापर केला. त्याशिवाय देवीची मूर्ती घडवण्यात येत नाही. ही एक खूप जुनी परंपरा असून ती आजही पाळली जाते. दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी जी माती आणली जाते, त्यासाठी सर्वात प्रथम वेश्यांची परवानगी घेतली जाते. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच त्यांच्या अंगणातील माती दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी घेतली जाते. यानंतर या मातीचा दुर्गा देवीची मूर्ती साकारण्यासाठी वापर केला जातो.
बंगाली लोकांची अशी मान्यता आहे की, ज्यावेळी एखादी व्यक्ती वेश्यालयात जाते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःमधील चांगले गुण पवित्रता वेश्येच्या दारातच सोडून आतमध्ये जाते. त्यामुळे त्या व्यक्तीचे चांगले कर्म आणि त्याची शुद्धता बाहेरच राहते. त्या व्यक्तीचे चांगले कर्म आणि शुद्धता वेश्यांच्या अंगणातील मातीत मिसळून जातात. ज्यामुळे अंगणातील माती देखील पवित्र होते. या कारणामुळेच दुर्गा देवीची मूर्ती बनवताना वेश्यांच्या अंगणातील माती वापरली जाते. ही माती त्यांची परवानगी घेऊन आणली जाते. खरे तर यामागे एक पौराणिक कथा देखील आहे.
पौराणिक कथा…
पौराणिक कथेनुसार, एकदा काही वेश्या गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना त्यांना घाटावर एक कुष्ठरोगी बसलेला दिसला. तो व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विनंती करत होता की कोणीतरी मला गंगेत स्नान घालावे. परंतु कोणीही त्याच्या जवळ जात नाही, हे पाहून वेश्यांना त्याची दया येते आणि त्या कुष्ठरोगी व्यक्तीला गंगेत स्नान घालतात. यानंतर स्वयम् भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकटतात. आणि त्यांना हवे ते वरदान मागण्यास सांगतात, यावेळी त्या सर्व वेश्या हेच मागतात की, “आमच्या अंगणातील मातीशिवाय दुर्गा देवीची मूर्ती घडवण्यात येऊ नये” त्यांच्या या इच्छेला शंकर भगवान आशीर्वाद देतात. तेव्हापासून आजवर ही प्रथा चालत आली आहे.