सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज 20 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 216 झाली आहे. आज अशोक चौक परिसरातील 48 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 14 झाली असून रुग्णालयात 173 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या 29 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आज दिवसभरात 175 कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 155 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. वीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. केगाव येथील क्वारंटाइन कॅम्पमधून आज 18 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
यामध्ये एका महिलेला सात मे रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सात मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजता त्या महिलेचे निधन झाले. या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असून तो आज प्राप्त झाला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
आज नव्याने आढळलेल्या 20 रुग्णांमध्ये शास्त्री नगर परिसरातील तीन पुरुष व तीन महिला, कुमठा नाका परिसरातील दोन पुरुष, नई जिंदगी परिसरातील एक पुरुष, अशोक चौक परिसरातील एक महिला, एकता नगर परिसरातील दोन महिला, नीलम नगर परिसरातील एक पुरुष व एक महिला, केशवनगर परिसरातील एक पुरुष, विजापूर रोडवरील मनोरमा नगर येथील एक पुरुष, सदर बझार लष्कर येथील एक पुरुष, लष्कर कुंभार गल्ली येथील एक पुरुष, साईबाबा चौकातील एक पुरुष व बापुजी नगर येथील एका पुरूषाचा समावेश आहे.