सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरच्या महापौरपदी ‘भाजपा’च्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी ‘एमआयएम’च्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला आहे. ओबीसी महिलांसाठी सोलापूर महापौरपद हे यंदा राखीव होतं. दरम्यान शिवसेनेच्या सारीका पिसे आणि कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली. या मध्ये यन्नम यांना ५१ मते, तर शेख यांना ८ मते मिळाली. यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीमुळे सोलापूर ‘मनपा’मध्ये ‘महाविकासआघाडी’चे चित्र फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ यांनी काम पाहिले. तत्पूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी मंगळवारी रात्री दिले होते. यामुळे महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली होती. यामुळे ‘भाजपा’च्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. सध्या त्यांच्या निवडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. तसेच हा निकाल महाआघाडीसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.