सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आज पूर्ण झाली. यावेळी खासदारांच्या वकिलांनी दिलेले 12 अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळून लावले आहेत. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली असून आता टपालाद्वारे पडताळणी समितीने निकाल पोहच करणार आहे. जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामीजींनी तक्रारदारांने आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे न दिल्याने भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम असल्याचे जात प्रमाणपत्र निवडणुकीवेळी दिले होते. यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीने दाखला तपासावा आणि खासदारांचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती.
त्यानुसार जात पडताळणी समितीसमोर सुनावणी पूर्ण झाली. आता निकालावर हा खटला बंद झाला असून आगामी आठ दिवसात पडताळणी समिती निकाल जाहीर करणार आहे. दरम्यान, पडताळणी समितीने 31 जानेवारी 2019 व 1 फेब्रवारी 2020 रोजी तक्रारदारांनी आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे द्यावीत, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, अद्यापपर्यंत महास्वामींनी मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे भाजपला निश्चितपणे धक्का बसेल, असा विश्वास तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.