मुलीचा मृतदेह सोबत घेऊन प्रवास करीत होते आई-वडील; धक्कादायक कारण आले समोर

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या 16 महिन्याच्या मुलीच्या मृतदेहासह प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला सोलापूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी गुरुवारी सोलापूर स्टेशनवर गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून बाळाच्या मृतदेहासह दोघांना अटक केली. हे आरोपी ट्रेनमधून लहान बाळाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
संबंधित मृत मुलीचे तिच्या बापाने आधी लैंगिक शोषण केलं आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. या नराधम बापाने 3 जानेवारी रोजी सिकंदराबादमध्ये आपल्या घरात 16 महिन्याच्या बाळाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. या सगळ्या गुन्ह्यात आरोपीच्या बायकोनेसुद्धा त्याला साथ दिली. ट्रेनमधून प्रवास करत असताना बराच वेळ बाळाचा आवाज न आल्याने आजूबाजूच्या लोकांना या दांपत्यावर संशय आला.

यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी तिकीट कलेक्टरला याची माहिती दिली. यानंतर सोलापूर रेल्वे पोलिसांना सतर्क करण्यात आले. यानंतर हि ट्रेन सोलापूर या ठिकाणी पोहोचताच या दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले आणि तपास करण्यात आला. या तपासात बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी नराधम बापाने या लहान बाळावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे कबुल केले. बाळाच्या आईने आपल्या पतीला या कामात साथ दिली. तसेच त्यांनी मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी ते ट्रेनने प्रवास करीत असल्याचे चौकशीत म्हंटले आहे. या प्रकरणी या दांपत्याला अटक करण्यात आली आहे.