सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत नव्याने आलेल्या सात रुग्णांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या सात रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 337 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण 74 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 67 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3218 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 22 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 106 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 3555 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सर्व्हे मध्ये नागरिकांनी खरी माहिती द्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाच्यावतीने संकलित केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना स्वतंत्र ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.