सौरव गांगुलीचे ‘बीसीसीआय’ अध्यक्ष म्हणून नाव निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । क्रिकेट विश्वावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा बॉस होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

अध्यक्षपदाच्या नावावरून बीसीसीआयमध्ये दोन गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावं पुढं केली होती. या दोन्ही नावावरून अनेक अंगांनी चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली. अध्यक्षपदासाठी गांगुलीचं नाव पुढं येण्याआधी या नावासाठी चर्चेत असलेल्या कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील. आसाम क्रिकेट असोसिएशनचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली आजच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या २३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेली बीसीसीआयची नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची चिन्हे आहेत.

इतर काही बातम्या-

Leave a Comment