हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा (SA Vs AFG) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकांत 56 धावांत गारद झाला. या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावरील चोकर्सचा शिक्का पुसला आहे. तब्बल २६ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे.
त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलती आला. मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, आणि नॉरकिया यांच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर एकही अफगाणी फलंदाज तिगू शकला नाही. अवघ्या 11.5 षटकांत 56 धावांत अफगाणिस्तानचा डाव आटोपला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ९ षटकात या धावांचा पाठलाग केला आणि फायनलमध्ये धडक मारली. दक्षिण आफ्रिकेचा संघ महत्वाच्या सामन्यात कच खातो म्हणून त्यांना चोकर्स म्हणतात, मात्र यंदा त्यांनी हा शिक्का पुसून काढण्यात यश मिळवलं असून तब्बल २६ वर्षानंतर कोणत्याही विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील सर्व उपांत्य फेरी
1992 एकदिवसीय विश्वचषक: इंग्लंडविरुद्ध 19 धावांनी पराभव
1999 एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना बरोबरीत सुटला (ऑस्ट्रेलिया सुपर-6 टेबलमध्ये अव्वल असल्यामुळे अंतिम फेरीत पोहोचला)
२००७ एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ गडी राखून पराभव
2009 T20 विश्वचषक: पाकिस्तानविरुद्ध 7 धावांनी पराभव
2014 T20 विश्वचषक: भारताविरुद्ध 6 गडी राखून पराभव
2015 एकदिवसीय विश्वचषक: न्यूझीलंडविरुद्ध 4 गडी राखून पराभव
2023 एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 गडी राखून पराभव
2024 T20 विश्वचषक: अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला