Thursday, March 23, 2023

दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

- Advertisement -

जोहान्सबर्ग । दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf Du Plesis) कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket Retirement) निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयाची माहिती त्याने बुधवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. त्याने यावेळी लिहिलं की, ‘हा निर्णय मी मोकळ्या मनाने घेतला आहे. नवीन प्रवास सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.’

डू प्लेसीसने लिहिलं की, ‘हे वर्ष आपल्या सर्वांसाठी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत जगण्याची नवी उमेद निर्माण करणारं वर्ष ठरलं आहे. अनेकदा अनिश्चितता देखील वाट्याला आली. पण याबाबतीत विविध बाबींविषयी माझं स्पष्ट मत बनलं आहे. त्यामुळे मी मोकळ्या मनाने निवृत्ती जाहीर करत आहे. कारण जीवनात एक नवीन प्रवास करण्याची ही योग्य वेळ आहे.’

- Advertisement -

त्याने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “क्रिकेट खेळाच्या सर्व प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणं हा माझा सन्मान आहे. पण आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. पुढील दोन वर्षात आयसीसी टी -20 विश्वचषक येणार आहे. त्यामुळे मी माझं सर्व लक्ष या क्रिडा प्रकारावर केंद्रित करणार आहे. ” त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आणि टी -20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. त्याने 2016 मध्ये एबी डिव्हिलियर्सकडून कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.

डु प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना एकूण 69 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 40 पेक्षा जास्तीच्या सरासरीने 4163 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 10 शतकं आणि 21 अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान,, दोन महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने शानदार फलंदाजी केली होती. सेंचुरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 199 धावांची दमदार खेळी साकारली होती. त्याची ही खेळी कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्यादेखील ठरली होती. त्याच्या या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना एक डाव आणि 45 धावांनी जिंकला होता.

मात्र, नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत डु प्लेसिसला आपल्या फलंदाजीने फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात 33 आणि दुसर्‍या कसोटी सामन्यात 22 धावा केल्या होत्या. दोन्ही कसोटी सामन्यात यजमानांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. तेव्हापासून त्याच्या कसोटी खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं.