हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्याहून थेट प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी आयआरसीटीसीने विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी पुण्यातून प्रयागराजकडे भारत गौरव ही विशेष ट्रेन रात्री १० वाजता सोडली जाणार आहे. ही विशेष रेल्वे देखो अपना देश योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे येत्या १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. हा कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालू असेल. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी होतील. यामुळेच भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नांदेड, औरंगाबाद, काचीगुड आणि सिकंदराबाद येथूनही प्रयागराजसाठी विशेष गाड्या सोडल्या जातील.
दरम्यान, या भव्य कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आणि भाविकांच्या सोयीसाठी तब्बल तीन हजार रेल्वे गाड्या आणि दोनशे चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे. तसेच, या कुंभमेळ्यासाठी 40 कोटीहुन अधिक भाविक उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज सरकारकडून सर्व आवश्यक त्या सोयी सुविधा राबविण्यात येणार आहेत.