औरंगाबाद | सध्याची कोवीडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हेाते. प्रारंभी सुनील चव्हाण यांनी मिशन बिगेन अगेनच्या नियमांचे सादरीकरण करुन नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल माहिती दिली.
वॉर्डनिहाय तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्यात यावे. पथकात जिल्हाधिकारी कार्यालयाचे २ व पोलीस प्रशासनाचा १ कर्मचारी असे प्रत्येकी ३ पर्यवेक्षक असावेत. तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक असावा, महापालिकेतील गर्दीच्या तसेच संवेदनशील वॉर्डामध्ये आवश्यकतेप्रमाणे ४ पर्यवेक्षकांचे पथक असावे, त्यामध्ये १ कर्मचारी महापालिकेचा असेल, प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत. तसेच प्रत्येक पथकामार्फत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन किमान १०० वाहनांवर कारवाई करावी.
रिक्षामध्ये दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्या बसेस, खासगी टुर्स व ट्रॅव्हल्स कंपन्या या सर्वांना ५० टक्के प्रवासी बसवणे याबाबत सूचना देण्यात याव्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची ५ पथके तयार करावीत. प्रत्येक पथकाने शहरातील राज्य उत्पादन शुल्कच्या अखत्यारीतील दुकाने रात्री वेळेत बंद होण्याच्या अनुषंगाने कारवाई करावीत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन किमान १० आस्थापनांवर कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासनाने तीन पथके गठीत करुन नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन प्रत्येकी किमान २० आस्थापनांवर कारवाई करावी, असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा