FIAचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत अक्कापल्ली यांची निवड

Srikanth Akkapall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

न्यूयॉर्क – १२ डिसेंबर २०२५ – ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स ऑफ युएसए’ (एफआयए-एनवाय-एनजे-सीटी-एनई) ही १९७० मध्ये स्थापन झालेली आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आठ राज्यांतील भारतीय समुदायांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात मोठी, अग्रगण्य आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. वर्ष २०२६ साठी त्यांनी नुकतीच संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. स्वतंत्रपणे नियुक्त केलेल्या निवड आयोगाच्या (अलोक कुमार, जयेश पटेल आणि केनी देसाई) नेतृत्वाखाली वार्षिक अंतर्गत पुनरावलोकन व निवड प्रक्रिया देखील संस्थेने पूर्ण केली आहे. आयोगाच्या शिफारशींना संचालक मंडळाची संपूर्ण मंजुरी मिळाली असून नव्याने निश्चित झालेले २०२६ चे कार्यकारी मंडळ १ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहे.


श्रीकांत अक्कापल्ली यांची सर्वानुमते २०२६ च्या कार्यकारी मंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली असून ते विद्यमान अध्यक्ष सौरिन पारिख यांची जागा घेतील. मागील टीममधील उपाध्यक्ष प्रीती रे पटेल आणि महासचिव सृष्टि कौल नरूला आपल्या वर्तमान पदांवर यापुढेही कार्यरत राहतील. यंदाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून, निवड आयोग व ‘एफआयए’ मंडळाने कार्यकारी मंडळ अधिक सुसूत्रबद्ध केले असून संस्थेचा विस्तार केला आहे. शाह अकाउंटंट्स, ही स्वतंत्र सीपीए फर्म, संस्थेच्या खजिनदाराची भूमिका पार पाडेल. अक्कापल्ली हे एक प्रख्यात उद्योजक असून त्यांचे कार्यक्षेत्र रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान, मीडिया आणि अमेरिकेत व भारतात डायस्पोरा एंगेजमेंटपर्यंत पसरलेले आहे. त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर विकास, ट्रान्झिट टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, लाइफ सायन्सेस, आयटी आणि क्लाउड कम्प्यूटिंग, क्रीडा उपकरण उत्पादन, तसेच प्रीमियम फर्निचर डिझाइनचा समावेश होतो. अक्कापल्ली हे त्यांच्या, दूरदर्शी नेतृत्व आणि मजबूत ऑपरेशनल क्षमतेसाठी ओळखले जातात.


नव-निर्वाचीत अध्यक्ष म्हणून केलेल्या आपल्या भाषणात, अक्कापल्ली यांनी विश्वस्त मंडळाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचा विश्वास मिळाल्याबद्दल “धन्यता आणि आनंद” व्यक्त केला. ‘एफआयए’ मध्ये स्वागत केल्याबद्दल आणि संस्थेच्या रुपाने “एक मोठे कुटुंब” मिळवून दिल्याबद्दल त्यांनी चेअरमन अंकुर वैद्य, तसेच संचालक मंडळ, विश्वस्त, सल्लागार सदस्य आणि कार्यकारी सहकाऱ्यांचेही आभार मानले. आपल्या मूळ राज्यातून या पदावर विराजमान होणारी पहिली व्यक्ती म्हणून या निवडीचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून, त्यांनी प्रामाणिकपणे आणि ध्येयाने सेवा करण्याचे आश्वासन दिले आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी, तिच्या प्रमुख उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि सखोल समुदाय सहभाग वाढवणाऱ्या कार्यक्रमांना विकसित करण्यावर आपण भर देणार असल्याचे अक्कापल्ली यांनी यावेळी सांगितले.


वरिष्ठ नेते आणि दीर्घकाळापासून संस्थेशी निगडित सदस्यांनी त्यांच्या निवडीचे मनापासून स्वागत केले आहे. एका ज्येष्ठ सदस्याने, अक्कापल्ली यांचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, सचोटी आणि दीर्घकालीन निष्ठावंत बांधिलकी याचे कौतुक केले, तसेच त्यांची नियुक्ती ही ‘एफआयए’च्या नेतृत्वामधील वाढत्या प्रादेशिक विविधतेचे प्रतिबिंब असलेली ऐतिहासिक घटना व भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले. शंभर टक्के स्वयंसेवकांच्या कामाद्वारे चालवली जाणारी आणि पाच दशकांहून अधिक काळ सेवेत असलेली ‘एफआयए’ ही, अमेरिकेच्या काँग्रेशनल रेकॉर्डमध्ये अधिकृत मान्यता प्राप्त करणारी, भारताचा प्रतिष्ठित ‘प्रवासी भारतीय सम्मान’ पुरस्कार मिळवणारी आणि दोन गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेली संस्था आहे.