श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची खरी लढत थोरात Vs विखे पाटील अशीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे लोकसभा निवडणुकीत यंदा मात्र आपटले… पण सत्तेत राहण्यासाठी त्यांचा जीव घुसमटतोय की काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय… कारण नगरच्या राजकारणात सर्वात जास्त उठून दिसणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार लोखंडे साहेब, त्यांचे चिरंजीव आणि यासोबतच इच्छुकांची भली मोठी यादी समोर आलीय… बरं इथले विद्यमान आमदार डॉ. लहू कानडे हे काँग्रेसचे… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीचा खासदार जरी काँग्रेसचा झाला असला तरी श्रीरामपूरमधून लीड हे महायुतीच्या उमेदवाराला मिळालंय… त्यामुळे काँग्रेसकडून हेमंत ओगले यांनीही आमदारकीसाठी मतदार संघात तळ ठोकलाय… साध्या भाषेत श्रीरामपूरच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं वर्णन करायचं म्हटलं तर जाळ अन धूर संगटच… असं म्हणावं लागेल… या सगळ्यात मुलाच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विखे पाटील इथं महायुतीच्या उमेदवाराला जोर देतील यात शंकाच नाही… त्यामुळे श्रीरामपूरचं ग्राउंड विधानसभेला कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतंय… श्रीरामपूरच्या आमदारकीचा गुलाल नेमक्या कुणाच्या कपाळाला लागतोय? त्याचंच केलेलं हे सविस्तर डिकोडिंग…

बेलापूर स्टेशनच्या अवती-भवती पसरलेली वस्ती पुढे श्रीरामपूर शहर म्हणून आकाराला आली… आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करतंय… अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. बॅरिस्टर रामराव आदिक, भानुदास मुरकुटे आणि जयंत ससाणे यांचा हा मतदारसंघ 2009 ला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… त्यानंतर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे दोन वेळेस प्रतिनिधित्त्व केले… 2019 ला भाऊसाहेब कांबळे यांनी निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला.. तेव्हा बाळासाहेब थोरतांना हा मोठा धक्का समजला जात होता… पण थोरातांनी शेरास सव्वाशेर राहत प्रशासकीय अधिकारी व लेखक असलेले लहू कानडे यांना उमेदवारी देऊन, निवडूनही आणले…. अनेक समाज उपयोगी योजना राबवल्यामुळे कामहाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता.. .

श्रीरामपूरमध्ये खरी लढत Thorat Vs Vikhe-Patil अशीच। Shrirampur Vidhan Sabha

त्यात महत्त्वाची योजना म्हणजे ‘ग्रामस्वच्छता अभियान’ ही योजना राबवून ती योजना यशस्वी करून दाखवली त्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली.. त्यांच्या रुपाने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामाची व मानसिकतेची खडानखडा माहिती असलेला अधिकारी राज्याच्या धोरणात्मक वाटचालीला योग्य दिशा दाखवणारा आमदार मतदारसंघाला मिळाला याची चर्चा कायम श्रीरामपूरमध्ये झाली… पण मागच्या पाच वर्षांचा विचार केला तर काँग्रेसचे आमदार साहेबांचं रिपोर्ट कार्ड म्हणावं इतकं चांगलं नाहीये… त्यात लोकसभेलाही श्रीरामपुरातून काँग्रेसचं लीड मायनसमध्ये गेल्याने कानडे यांची आमदारकी तशी गॅसवरच आहे… त्यामुळे ससाणे गटाचे हेमंत ओगले काँग्रेसकडून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत… मतदारसंघात ससाणे गटाला मानणारा मोठा वर्ग आहे… जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची तालुक्यात निर्णायक वोट बँक आहे… त्यामुळे काँग्रेसमध्ये श्रीरामपूरच्या जागेवरून तिकीट वाटपासाठी मोठा रस्सीखेच होणार हे तर फिक्स आहे… मुळात 2019 लाच या जागेसाठी हेमंत ओगले व आमदार कानडे यांच्यात रस्सीखेच झाली होती… मात्र बाळासाहेब थोरातांनी ससाणे व कानडे यांच्यात काही तडजोडी करून कानडे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. आ. लहु कानडे यांना नियोजनबध्द पध्दतीने विजयी करुन विखे पाटलांची कोंडी केली….

पण सध्या श्रीरामपूरचं जिओ पॉलिटिक्स बदलून गेलय… कानडेंना नको मला उमेदवारी द्या, म्हणून काँग्रेसचेच ओगले अडून बसलेच आहेत… पण दुसऱ्या बाजूला महायुतीतही उमेदवारीचा मोठा झांगडगुत्ता झालाय… माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेत उमेदवारीसाठी आपली जागा कन्फर्म केली नाही तोच लोकसभेला पराभवाचा धक्का बसलेले सदाशिव लोखंडे किंवा त्यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटाकडे सेटिंग लावल्याची चर्चा आहे… या सगळ्या सीनमध्ये अशोक कारखाना निवडणुकीत ससाणे गटाशी युती केलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मात्र आमदारकीची तलवार म्यान केल्याने ते फक्त आपलं एकगठ्ठा मतदान ससाने गटाच्या म्हणजेच ओगलेंच्या पाठीशी कसं लावता येईल? याचा प्रयत्न करताना दिसतील… थोडक्यात श्रीरामपूरच्या निवडणुकीसाठी मोठा गुंता असला तरी सध्या विद्यमान आमदार लहू कानडे, हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, सदाशिव लोखंडे किंवा चेतन लोखंडे अशी नाव आमदारकीच्या रेसमध्ये सध्या फ्रंटला आहेत…

आता येऊयात मतदार संघातील जमिनीवरच्या मुद्द्यांवर… श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊनही अजूनही शहराला जिल्ह्याचा दर्जा न मिळाल्याने हा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट टॉपिक ठरू शकतो… बाकी लोकसभेला महायुतीला मिळालेलं लीड, विखे पाटलांची ताकद, लोखंडे पिता पुत्रांसारखे तकडे उमेदवार प्लस मध्ये असल्याने काँग्रेसच्या उमेदवारासाठी ही लढत सोपी नसणार आहे… काँग्रेसकडून ओगले की कानडे या नावावर शिक्कामोर्तब होणं बाकी असल तरी ओगले यांच्या पाठीशी स्थानिक गट असल्याने त्यांच्या नावाचा आग्रह काँग्रेस हायकमांड कडे केला जाऊ शकतो… 2009 पासून तसा बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा मतदारसंघावर राहिलाय… त्यांचं बारीक लक्ष असल्यामुळेच आतापर्यंत काँग्रेसला इथून हार मिळाली नाही… पण लोकसभेचा निकाल कायम राहिला तर यंदा भाजपाला पहिल्यांदाच श्रीरामपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्यांदाच खातं खोलता येऊ शकतं… मत विभाजन कोणाच्या पथ्यावर पडतंय? विखे पाटील विरुद्ध थोरात त्यांच्यात वरचढ कोण ठरतंय? कांबळे बंड करतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक दबाव गट कुणाच्या पाठीशी राहतील? या सगळ्या फॅक्टरवर श्रीरामपूर चा आमदार कोण? हे ठरणार आहे… बाकी, तुम्हाला काय वाटतं? श्रीरामपूरचा 2024 चा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…