हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ लोकाच्या सेवेत कार्यरत असून, त्यांनी लाखो प्रवास्यांचा प्रवास सुलभ केला आहे. या मंडळाने आता अपघात कमी करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रमावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी अनेक योजना आखल्या जाणार आहेत. यात चालक प्रशिक्षण, मानसिक आरोग्य सुदृढीकरण, तसेच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस सेवा हे मुख्य घटक असणार आहेत. तसेच लवकरच प्रलंबित असलेल्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक –
गोगावले यांनी नुकत्याच झालेल्या भंडारा व नाशिक येथील एसटी अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चालकांच्या निवडीची चाचणी, प्रशिक्षण, आणि बसच्या तांत्रिक तपासणीबाबत सखोलपणे चर्चा झाली. त्यांनी चालकांना दर सहा महिन्यांनी उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून घेण्यात आला आहे.
तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव –
गेल्या काही वर्षांपासून इंधन दरवाढ, सुट्ट्या भागांच्या किमती, त्याचसोबत कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने 2021 पासून प्रलंबित असलेल्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
एसटी महामंडळाकडे सध्या 14000 बस –
एसटी महामंडळाकडे सध्या 14000 बस आहेत, मात्र प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. अनेक बस खराब झाल्यामुळे महामंडळाने नवीन बस खरेदीसाठी प्रक्रिया राबवली होती. पण वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या संस्थांना नोटीस पाठविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महामंडळाने चालकांना सेवेत राहण्यासाठी वाहन कौशल्य तपासणी आणि नशापानविरहित कामाचे पालन सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे नियम खासगी चालकांनाही लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.