पर्यटन राजधानीत एसटी महामंडळाकडून पर्यटकांची हेळसांड सुरुच ! शिवनेरी, शिवशाहीऐवजी आता पाठवली चक्क लालपरी

औरंगाबाद – कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लोक डाऊन चे निर्बंध हटवण्यात आल्यानंतर आता सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यातच शनिवार, रविवारसह सलग चार दिवस सुट्ट्या जोडून आल्यामुळे जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेणींचे अनुपम सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी नियोजन केले होते. ऑक्टोबर हिटमुळे अनेकांनी एसटी महामंडळाचे वातानुकूलित शिवनेरी बसचा सुखकारक प्रवास निवडला‌. परंतु, शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवस महामंडळाने गलथानपणा करत या बसेस पुण्याला पाठवल्या होत्या त्यामुळे पहिल्या दिवशी वातानुकूलित बस ऐवजी ऐनवेळी शिवशाहीतून तर काल रविवारी चक्क साध्या लाल्परी बस मधून प्रवाशांना पर्यटनाचा आनंद घ्यावा लागला.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने पर्यटकांच्या सोयीसाठी शिवनेरीही वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. खास करून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेली शिवनेरी वातानुकूलित बस वेळेवर उपलब्ध न झाल्याने अखेर पर्यटकांना साध्या लालपरीतून प्रवास करावा लागला. एसटी महामंडळाकडून गर्दीचा हंगाम काळात पर्यटकांची दुसर्‍याही दिवशी सुरू असलेली हेळसांड यामुळे पर्यटकांनी एसटीच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळाच्या वतीने गाड्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, एसटीचे स्थानिक अधिकारी हे उपक्रम राबवताना कुठल्याच प्रकारचे नियोजन करत नसल्यामुळे या उपक्रमाला खीळ बसत आहे.

दरम्यान, पर्यटन स्थळे खुली केल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्या साठी पाहणाऱ्या पर्यटकांना जाणा येण्याची सुविधा व्हावी यासाठी मध्यवर्ती बस स्थानकातून दोन वातानुकूलित शिवनेरी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु, एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत शनिवारी या दोन्ही वातानुकूलित शिवनेरी बसेस पुण्याला पाठवल्या तर रविवारी देखील या बसेस उपलब्ध झाल्या नव्हत्या. त्यामुळे आलेल्या पर्यटकांनी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.