राजगुरुनगर : हॅलो महाराष्ट्र – पुणे-नाशिक महामार्गावर एका कारचालकाने पुढे जाण्यास बाजू न दिल्याने एसटी चालकाला मारहाण केली आहे. कारचालक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिला वाहकाला कारसोबत 100 फुटांपर्यत फरफटतसुद्धा नेले. याप्रकरणी एसटी बस चालक सदु किसन भालेराव यांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहेत.
हि घटना एसटी राजगुरुनगर आगाराची असून पुणे -नाशिक महामार्गावरून मंचरच्या दिशेनं जात होती. या दरम्यान तुकाईभांबुरवाडी याठिकाणी पाठीमागून येणाऱ्या एका व्यक्तीने एसटीला ओव्हर टेक करत कार बसच्या समोर आडवी उभी केली. यानंतर आरोपीने कारमधून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. यानंतर आरोपीने चालकच्या बाजूचा दरवाजा उघडून एसटी चालक सदु भालेराव यांना मारहाण केली. यावेळी एसटी बसच्या कंडक्टर सारिका चिंचपुरे यांनी या कारचालकाला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘आम्ही ऑन ड्युटी आहोत. आमच्याशी असे वर्तन करू नका अशा शब्दांत चिंचपुरे यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पण आरोपीने काहीही ऐकून न घेता, ‘मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे. मी तुमच्या तुमच्याकडे बघून घेतो. मी कोण आहे ते तुम्हाला दाखवतो ’’ अशी धमकीसुद्धा दिली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून कारमध्ये बसून निघून जात असताना एसटी वाहक चिंचपुरे यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी येत आहेत, तोपर्यंत थांबण्याची विनंती केली पण तो न थांबता निघून जाऊ लागला. त्यामुळे वाहक चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायपर धरण्याचा प्रयत्न केला तरीदेखील आरोपीने कार थांबवली नाही. आरोपीने चिंचपुरे यांना जवळपास 100 फुटांपर्यंत परफटत नेले. यादरम्यान दुसऱ्या गाडीतील लोक मोठ्याने ओरडल्याने आरोपीने कार थांबवली. यानंतर आरोपी मंचरच्या दिशेने निघून गेला.