औरंगाबाद | आजच्याघडीला जर एखाद्याला दुसऱ्याची एखादी मौल्यवान वस्तू सापडली तर बहुतांश लोकं ती वस्तू परत करत नाहीत. परंतु औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका चालक आणि वाहकांनी आपल्या बसमध्ये सापडलेले तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दागिने त्याच्या मूळ मालकाला परत केले आहेत. यामुळेच एसटीचा प्रवास सुरक्षित आहे, असे मानल्या जाते. एसटीच्या चालक वाहकांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून बोलठाण ते वाकला या मार्गावर मुक्कामी बस जाते. या बसमध्ये दि. १७ जुलै रोजी प्रवास करताना एका महिलेचे मौल्यवान दागिने त्यामध्ये ८० मणिचे मणिमंगळसूत्र, कानातील फुल आणि वेल यासोबत इतरही काही सामान अनावधानाने बस (एमएच २० बील ३२७१) मध्ये विसरून राहिले. रात्री आपली ड्युटी संपल्यावर बस चेक करत असताना बसचे चालक एस.एम. स्वामी आणि वाहक के.एस. तारू याना हे मौल्यवान वस्तू आढळून आल्यावर, त्यांनी त्याच्या मोहात न अडकता त्या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडे सुपूर्द केल्या. त्यांनतर आगार प्रमुखांनी सर्व बाबींची शहनिशा करत दीड लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू संबंधित महिलेला परत केल्या.
एसटीच्या चालक वाहकांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकंदरीतच त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.