सांगली । राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळं जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. गेले ४ महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचाही दोन महिने पगार झाले नव्हता. त्यामुळे तो संटकात होता. त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माळी हे एसटीच्या इस्लामपूर आगारातील मेकॅनिक विभागात कार्यरत होते. करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये एसटीची वाहतूक काही प्रमाणात बंद आहे. या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळाला नाही. काम बंद असल्याने, तसेच नियमित पगार मिळत नसल्याने अमोल अस्वस्थ होते.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून सावरण्यासाठी ते गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीचीही कामे करत होते. लांबत चाललेला लॉकडाउन आणि एसटीच्या रुतलेल्या चाकांमुळे आर्थिक गाडा हाकणार कसे या विवंचनेत ते होते. त्यांची अस्वस्थता वाढली होती. आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून त्यांनी अखेर गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरी छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असं कुटुंब आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”