हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ दिवसांपासून सुरु असलेला ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघाला. ST कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना गणेशोत्सवापूर्वी काहीसा दिलासा मिळाला आहे. (ST employees’ strike called off)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचे मान्य केलं आहे. तसेच ज्यांना कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त करत आपला संप मागे घेतला आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांसंवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आमची मागणी होती की, राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतननुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतम मिळावं. किमान त्यांच्या लेव्हलला घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे असं पडळकर म्हणाले.