हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाल्यापासून एसटी प्रवासांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. परंतु अशा काळातच एसटी महामंडळाने (ST Corporation) एसटीच्या तिकीट (ST Ticket) दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संदर्भातील प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
उन्हाळा सुरू झाला की राजाभरातून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील दुपटीने वाढते. या प्रवाशांमध्ये सर्वाधिक उन्हाळी सुट्ट्यांसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांचा, देवदर्शनासाठी धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश असतो. यावर्षी देखील अशा विविध कारणांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळाने उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवला आहे.
त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास गावाकडे जाणाऱ्या बस प्रवाशांना तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महत्वाचे म्हणजे, ही भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान असू शकते. दरवर्षी एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते. त्यानुसार यावर्षी देखील उन्हाळ्यात ही भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला. ज्याचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यांपासूनच उन्हाळी सुट्टीला सुरुवात झाली आहे. तर 10 एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. सध्या 13 हजार एसटीच्या मार्फत दिवसभरात सुमारे 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत. यातूनही सुट्ट्या पडल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळेच महसूल वाढीसाठी एसटी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पुढे पाठविला आहे.