हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एखाद्या धर्माप्रमाणे क्रिकेटला मानणारे आणि या खेळाचा आनंद घेणारे करोडो चाहते भारतात आहे. इंडियन प्रीमिअर लीग तसेच देशातील अन्य स्पर्धांमुळे क्रिकेट बद्दल तरुण पिढीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतात लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नेहमी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. अशातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा करत क्रिकेटप्रेमींच्या आनंदात भर घातली आहे. महाराष्ट्रातील परळी शहरात राष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम (Cricket Stadium In Parli) भारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटल आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि युवराज सिंह हे सुद्धा उपस्थित होते.
परळी शहरात आयोजित नामदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, परळी मध्ये भव्य स्टेडियम उभारण्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निधी मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुका झाल्या कि विधानसभा निवडणुकीच्या आधी या क्रिडा संकुलाचे भूमिपूजन होईल. तसेच आयपीएलच्या धर्तीवर बीपीएल स्पर्धाही खेळवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली. हि स्पर्धा २० षटकांची असेल. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राज्य पातळी आणि देश पातळीवर संधी मिळू शकते असेही धनंजय मुंडे यांनी म्हंटल.
दरम्यान, भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खानने यावेळी मराठीत भाषण करत खेळाडूंना आणखी मेहनत घ्यायला सांगितलं. मी श्रीरामपूरमधील आहे, मी अशा टुर्नामेंटमध्ये खूप खेळलो. परळी शहराला अशा सुविधा मिळाल्या तर नक्कीच चांगले खेळाडू घडतील. आणि देशासाठी खेळायची संधी या खेळाडूंना मिळेल असं झहीर म्हणाला.