औरंगाबाद | ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील 52 दरवाजापैकी एक महेमूद दरवाजा शेवटच्या घटका मोजत असून या दरवाजाची कमान मध्यभागी वाकली आहे. याच पार्श्वभूमी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी या दरवाजाची पाहणी करत स्मार्ट सिटीच्या निधीतून त्वरित कामाला सुरुवात करून आसपासची अतिक्रमणेही काढण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत शहरातील नऊ दरवाजांची डागडुजी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु या महेमूद दरवाजा ची अंदाजपत्रकीय रक्कम कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्याचवेळी दोन मोठ्या वाहनांनी या दरवाजांना धडक दिल्यामुळे दरवाजाची कमान पूर्णपणे कोलमडली. यामुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन मनपाच्या वॉर्ड कार्यालयाने हा रस्ताच बंद केला. परंतु या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दरवाजाच्या पाठीमागून धोकादायक पद्धतीने ये-जा करण्यास सुरुवात केली. या धोकादायक पद्धतीमुळे आतापर्यंत दोन ते तीन जण खाम नदीच्या पात्रात पडले आहेत.
नागरीक स्वतःच्या जीवाशी खेळत धोकादायक पद्धतीने रस्ता काढत आहेत यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या असून दरवाजाचे काम त्वरित सुरू करत आसपासची अतिक्रमणे आणि घाटी रुग्णालय ते महमूद दरवाजापर्यंत असलेले विद्युत पोल त्वरित काढण्याचे निर्देश आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.