पुणे | पुढील महिन्यांपासून पावसाळा सुरु होत आहे. यंदा पाऊसही चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्र्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. गतवर्षी अचूक नियोजनावर भर दिला होता. त्यानुसार यंदाही नियोजन केले जाणार आहे.
पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जलसंपदामंत्री पाटील यांनी संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी बैठक घेतली. 2019 मध्ये पश्र्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीला स्वतः उतरले होते. त्यावेळी पाटील यांना स्वतः अनेक अडचणींचा त्यावेळी सामना करावा लागला होता. म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अलर्ट केली आहे. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे.
पाऊस सुरु होण्यास अद्याप काही कालावधी शिल्लक आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधीही बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गतवर्षी पूरस्थिती निर्माण झाली होती, मात्र कर्नाटक सरकारशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार यावर्षीही महापुरामुळे नुकसान होणार नाही, याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.