सर्वसामान्यांना दिलासा !! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून दिवाळीची हंगामी दरवाढ रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने मोठा दिलासा दिला आहे.

“राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे. मात्र यंदा करोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे,” असं परब म्हणाले.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment